calendar

header ads

१. वाढ, विकास आणि विकासाचे विविध दृष्टिकोण

घटक १

वाढ, विकास आणि विकासाचे
विविध दृष्टिकोण

अध्ययन निष्पत्ती
छात्राध्यापक -

या घटकाचा अभ्यास केल्यानंतर, छात्र अध्यापक
१. वाढ व विकास संबोध स्पष्ट करतो.
२. वाढ व विकास यातील फरक सांगतो.
२. बालकाच्या विकासाची तत्त्वे सांगतो.
४. बालकाच्या वाढ, विकासाच्या अवस्था व त्यांची वैशिष्ट्ये सांगतो.
५. बालकाच्या विकासाचे विविध दृष्टिकोण सांगतो.
६. बालकाची माहिती संकलनाची तंत्रे व साधने सांगतो.
७. बालसाहित्याचे मानसशास्त्रीय महत्त्व स्पष्ट करतो.
८. वाढ व विकास तत्त्वे लक्षात घेऊन अध्यापन करतो.

९. बालक विकास अवस्था व त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन बालकांशी
संबंध प्रस्थापित करतो.

१०. बालकाची माहिती संकलनाची तंत्रे व साधने यांचा योग्य वेळी
उपयोग करतो.

प्रास्ताविक
(अ) वाढ व विकासाची ओळख

व्यवहारात वाढ व विकास हे दोन्ही शब्द अनेक वेळा एकाच अर्थाने वापरले
जातात. परंतु त्यांच्यात फरक आहे हे लक्षात घ्या. बालकात सारखे बदल घडत असतात, त्याच्या शरीरात व आकारात बदल होतात. तसेच उंची व वजन वाढत असते.
मनात व गतीत बदल होत असतो. हे झालेले बदल केव्हा स्पष्ट दिसतात तर केव्हा हे
बदल स्पष्ट दिसत नाहीत. अशा प्रकारच्या परिवर्तनात दोन भाग असतात. त्यापैकी एक
वाढ व दुसरा विकास

वाढ : बालकाच्या वयाबरोबर शरीर वाढत जाते. त्याची उंची व वजन वाढते.
मेंदूची वाढ होते. शरीराचा आकार बदलतो. त्याचे हृदय, फुप्फुसे यांची वाढ होते.
बालकांमध्ये होणारे हे बदल संख्यात्मक स्वरूपाचे असतात. या संख्यात्मक स्वरूपाच्या
बदलांना वाढ म्हणतात.

वाढ ही संख्येत मोजता येते व नोंदविता येते. वाढ ही मर्यादित असते. काही
विशिष्ट वयानंतर अवयवांची वाढ थांबते ती नगण्य असते. वाढ ही नेहमी दृश्य
स्वरूपात असते. वजनात, उंचीत वाढ झाली हे प्रत्यक्ष पाहता येते, मोजता येते आणि ती
वाढ संख्येत लिहिताही येते. वाढ ही नैसर्गिक असते आणि ती आनुवंशिक गुणधर्मावर
अवलंबून असते.

विकास : बालक आवाज करते, इतराचा आवाज ऐकते, त्याप्रमाणे आपण शब्दख
उच्चारण्याचा प्रयत्न करते, त्या शब्दाचा अर्थ जाणू लागते, हळूहळू त्याला विचार करता
येतो. या सर्व बाबी आपणास संख्यात्मक स्वरूपात मोजता येत नाहीत. त्याचप्रमाणे
बालकाच्या भावना विकसित होतात, सुंदर वस्तू पाहून बालकाला आनंद होतो. याही
बाबी आपणास संख्येत मोजता येत नाहीत. परंतु हे सर्व बालकांत होणारे बदलच आहेत.
हे बदल गुणात्मक स्वरूपात आहेत एवढेच. अशा प्रकारच्या गुणात्मक स्वरूपाच्या
बदलांना विकास म्हणतात.

निश्चित दिशेने, क्रमशः सुसंगतपणे व प्रागतिक स्वरूपात बदल होण्याची प्रक्रिया
म्हणजे विकास होय.

बालकामध्ये होणारे इष्ट ते गुणात्मक व संख्यात्मक बदल म्हणजे विकास होय.
परिपक्वतेच्या दिशेने होणारे परिवर्तन म्हणजे विकास होय.

म्हणजेच विकास हा शब्द वाढसारखा मर्यादित अर्थाने वापरलेला नसतो तर तो
व्यापक अनि वापरलेला असतो. विकासामध्ये वाढदेखील अंतर्भूत असते. वाढहा
विकासाचा एक अविभाज्य घटक म्हणून मानावयास हरकत नाही.

शारीरिक विकास हा शारीरिक वाढीवर अवलंबून असतो. असे असले तरी शारीरिक
वाढीमळे शारीरिक विकास होतोच असे नाही. शरीराच्या आकारात होणारी वाढ,
शारीरिक अवयवांच्या आकारात होणारे बदल आणि अवयवांच्या कार्यातील सुसंगतपणा या सर्वांचा समावेश विकास यामध्ये होतो.
उदा.चापल्यपूर्ण खेळात कौशल्य मिळवणे हा झाला स्नायुंचा विकास.

आनुवंशिक गुणविशेषावर परिस्थिती, सराव व प्रशिक्षण या तिन्हींचा परिणाम होऊन विकास होत असतो. म्हणजेच विकास हा मिश्र परिणाम आहे.
गुणात्मक स्वरूपात असणारे सर्व विकास दृश्य स्वरूपात नसतात. उदा. भावना,विचार, कल्पनाशक्ती इत्यादी विकसित झाली तर ती लगेच दृश्य स्वरूपात दिसेल असे नाही.

विकास हा क्रमाक्रमाने घडतो. विकासाच्या अवस्था एकमेकांत इतक्या गुंतला आहेत की, त्यामुळे या ठिकाणी एक अवस्था संपते व दुसरी सुरू होते असे निश्चितपणे सांगता येत नाही. तसेच विकासाची विविध अंगे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे
शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकास अशा अंगांचा अलगपणे विचार
करताना कृत्रिमतेचा दोष पत्करावा लागतो. केवळ सोय म्हणून या अंगांचा वेगवेगळा अभ्यास केला जातो.

वाढ व विकास यातील फरक

१. वाढ ही संख्यात्मक बदलाशी निगडित आहे तर विकास हा गुणात्मक बदलाशी
निगडित आहे. जसे वजन वाढते, आकार वाढतो, केस वाढतात हे सर्व संख्यात्मक
बदल आहेत तर शारीरिक, बौद्धिक, नैतिक, सामाजिक संदर्भातील बदल हे गुणात्मक
आहेत.
२. प्रत्येक वाढीला एक मर्यादा असते. मर्यादपलीकडे वाढ होत नाही. जशी प्रत्येक अवयवांची वाढ. तर विकासाला निश्चित मर्यादा नसते. जसे एखादी व्यक्ती आयुष्यभर विद्यार्थी असते.
३. वाढ ही काही काळानंतर थांबते, मंदावते परंतु विकास सतत होतो.
४. वाढ ही निश्चितपणे सुरू असणारी प्रक्रिया आहे. तर विकास ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
५. वाढ ही सुरुवातीला वेगाने आणि नंतर हळूहळू कमी होत जाते. तर विकासाचा
वेग सुरुवातीला अधिक असतो, नंतर स्थिरावतो आणि वृद्धावस्थेत विकासात्मक बदल
मंदावतो.
६. बालकाचा विकास होताना मेंदूतील पेशी संख्या व आकार वाढतो. तसेच
त्यातील स्मरण, स्मृती, तर्क इत्यादी क्षमतांचा विकास होतो. म्हणून वाढ व विकास
प्रक्रिया परस्परांशी निगडित आहेत.

बालकाच्या विकासाची तत्त्वे

बालकाच्या विकासाची सर्वसामान्य तत्त्वे ज्याला आपण लक्षणे किंवा वैशिष्ट्ये असे म्हणतो ती खालीलप्रमाणे आहेत.

१. विकास हा सातत्याने होत असतो. प्रत्येक क्षणाला बदल होत असतात म्हणून तो अखंडित आहे असे म्हणतात,

२. विकास हा विशिष्ट क्रमाने होत असतो. उदा. बालक प्रथम एका अंगावर होते.नंतर रांगते, नंतर उभे राहते, आधाराने चालते, आधाराशिवाय चालते, पळते वगैरे.तसेच बालक दुसऱ्याचे उच्चार ऐकते, आपण स्वतः उच्चार करण्याचा प्रयत्न करते नंतर वाक्य उच्चारते वगैरे.

३. विकास हा संकलित स्वरूपात दिसतो. विकास हा एकदम होत नाही. तो चालू असतो, परंतु एखाद्या दिवशी आपल्याला तो दिसतो. उदा. बालकाने प्रथमच उच्चारलेला एखादा शब्द जसे आई, बाबा वगैरे ही क्रिया एकाएकी निर्माण झालेली नसते. त्याची पूर्वतयारी चालूच असते. आपणास ती तयारी दिसत नाही एवढेच.

४. विकास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रगत होत जातो. सुरुवातीस बालकाच्या
हालचाली स्थूल असतात. त्यांना निश्चित दिशा नसते. उदा. भूक लागली किंवा त्याच्या हातातील वस्तू घेतली तर मूल सर्व शरीराची हालचाल करते. परंतु विकास होईल त्याप्रमाणे त्यात सफाईदारपणा येतो आणि विशिष्ट स्नायूपुरतीच हालचाल झालेली दिसते.

५. विकासाची विविध अंगे असून विकास हा संकीर्ण (complex) असतो. विकास अनेक बाजूंनी होतो परंतु तो सारखाच होतो असे नाही. उदा. पहिली २-३ वर्षे मेंदूचा विकास जलद होतो तर शारीरिक विकास कमी होतो. लैंगिक विकास १२ वर्षांपर्यंत अगदी मंद गतीने होत असतो.

६. विकासप्रक्रियेचा घाट (Pattern) व्यक्ती-व्यक्तींनुसार भिन्न असतो.
उदा. वाचनक्षमता भिन्न, सामाजिक विकास भिन्न, समस्या सोडविण्याची क्षमता भिन्न,

७. व्यक्ती व परिस्थिती यांच्या आंतरक्रियेवर विकास अवलंबून असतो. शाळेतील.समाजातील व कौटुंबिक वातावरणाचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो.

८. विकासाची गती प्राथमिक अवस्थेत अति जलद असते. उदा. शारीरिक विकास बाल्यावस्थेत जास्त होतो. तिसऱ्या वर्षांपर्यंत ज्ञानेंद्रियांची क्षमता वाढते. मज्जासंस्थेचा विकास होतो म्हणून मानसिक विकास जास्त म्हणूनच पूर्व प्राथमिक शिक्षणाला जास्त महत्व आहे. परंतु भारतात त्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसुन येत नाही

९. विकासात योग्य वेळी प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळाल्यास विकास चांगला होण्यासाठी फायदेशीर ठरते. पक्वतेचा विचार न करता दिलेले प्रशिक्षण व सराव यांचा उपयोग होत नाही. अभ्यासक्रम तयार करताना या बाबींचा विचार करणे गरजेचे असते.

१०. विकास प्रक्रिया संश्लेषणात्मक (intergrative) व पृथक्करणात्मक
(differentiative) अशी उभयस्वरूपी असते. उदा. नव्या सवयी जडतात तेव्हा जुन्या सवयी नष्ट होतात. आत्मविश्वास वाढताना न्यूनगंड कमी होतो. प्रेमभावनांचा विकास
होऊ लागला की, द्वेष, मत्सर कमी होतो.

(ब) बालकाच्या विकासावस्थेची वैशिष्ट्ये

बालकाच्या विकास अवस्था पुढीलप्रमाणे -

विकास अवस्था            कालावधी
१. गर्भावस्था          -   गर्भधारणेपासून जन्मापर्यंत
२. शैशवावस्था।      -  जन्मापासून ६ वर्षांपर्यंत
३. किशोरावस्था      -  ६ ते १२ वर्षांपर्यंत
४. कुमारावस्था       - १२ ते १८, १९ वर्षांपर्यंत
५. प्रौढ़ावस्था          -  २० ते ४०, ४५ वर्षांपर्यंत
६. वृद्धावस्था          -  ४५ वर्षांच्या पुढे

अवस्था व कालावधी हे विभाजन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले आहे. त्यातील प्राथमिक शाळेत शैशवावस्था हिच्यासंबंधी माहिती हवी म्हणून आपण शैशवावस्था, किशोरावस्था व कुमारावस्था यांच्या संबंधीच फक्त विचार करणार आहोत. इतर अवस्थाशी शिक्षकांचा संबंध येत नाही. या विकासाच्या अवस्था एकमेकीत
गुंतलेल्या आहेत. केवळ सोय म्हणून वेगवेगळ्या अवस्था मांडत असतो.

शैशवावस्थेची वैशिष्ट्ये

१. या काळात वाढ व विकास जास्त वेगाने होत असतो.
२. परंतु या अवस्थेत लैंगिक विकास होत नाही.

३. मूलभूत गरजा प्राप्त करण्यासाठी शिशू आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतो.

४. इतरांनी आपल्यावर प्रेम करावे असे यांना वाटते.

५. या वयातील बालक स्वतःचे बरोबर व दसऱ्याचे चुकीचे असे समजतो. यांच्यात आत्मगौरव जास्त असतो.

६. या वयातील बालके स्वार्थी व अहंकारी असतात. प्रत्येक वस्तू ही माझीच आहे असे ती म्हणतात.

७. हे बालक स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.

किशोरावस्थेची वैशिष्ट्ये

१. किशोर अवस्थेत सावकाश परंतु सतत एकसारखी वाढ व विकास चालू असतो.

२. स्वतंत्रपणे काम करणे यांना आवडते. आपल्या कामात इतरांनी हस्तक्षेप करू नये असे यांना वाटते. थोडक्यात, त्यांच्यात आत्मनिर्भरता आलेली असते.


३. मानसिक विकासाची गती जास्त असते. अमूर्त विचार करण्याची क्षमता यांच्यात
येऊ लागते. समस्या सोडविण्यासाठी वातावरणाशी समायोजन साधतो.

४. या अवस्थेत अभिरुचीचे क्षेत्र विस्तारते. आपली आवड-निवड सांगतो.

५. हा काळ भावनावरील नियंत्रणाचा काळ समजला जातो. भावनावर व वर्तनावर नियंत्रण ठेवतो. आपल्या भावना सामाजिक पद्धतीने व्यक्त करतो.

६. परस्पर सहकार्य, समूह भावना विकसित होतात, समूहात खेळतात.

७. या काळात कामेच्छा सुप्त असते. कुमार अवस्थेत ती दिसू लागते.


कुमारावस्थेची वैशिष्ट्ये

१. किशोर अवस्थेत वाढ व विकास यांचा वेग कमी झालेला असतो. तो या कुमारावस्थेत पुन्हा अधिक झालेला दिसून येतो..

२. या काळात सर्व ग्रंथी पूर्ण त-हेने कार्य सुरू करतात आणि अवस्थेच्या शेवटी शारीरिक वाढ व विकास पूर्ण झालेला असतो.

३. या काळात भय, प्रेम, ईर्षा, क्रोध व चिंता अशा सर्व भावना विकसित झालेल्या असतात. त्यामुळे हा भावनात्मक स्थिरता अनुभवतो.

४. कुमार अवस्थेतील बालक चंचल, उत्तेजित, अशांत, संवेदनशील व भावुक असते.

५. या काळात सामाजिक संबंधांचा विकास जास्त होतो म्हणून तो सामाजिक संबंध वाढवितो. सामाजिक नियमानुसार वागण्याचा प्रयत्न करतो.

६.इतरांनी आपल्याला बालक न समजता प्रौढ समजावे असे या वयातील बालकांना वाटते.

७. समवयस्क मंडळींचा सल्ला, मार्ग योग्य वाटतो. आई-वडिलांनी अधिक बंधने घालणे चुकीचे ठरते. काही वेळा हे विद्रोह करतात.

८. या काळात बुद्धिमत्ता, तर्कचिंतन, चिकित्सक विचार, एकाग्रता इत्यादी मानसिक शक्ती पूर्णपणे विकसित होतात. कार्यकारण संबंध शोधतात. या वयातील बालक ईश्वर,
धर्म, आस्तिकता, नास्तिकता, आत्मा, पाप-पुण्य इत्यादी तात्विक गोष्टींवर चर्चा करतात.

९. या अवस्थेत लैंगिक विकास होतो. त्यामुळे मुले-मुली एकमेकांकडे आकर्षित होतात. विरुद्ध लिंगात मैत्री वाढवितात.

(क) विकासाचे विविध दृष्टिकोण

व्यक्तिविकासाच्या अभ्यासाबाबतचे प्रमुख दृष्टिकोण दोन आहेत. एकाला
आयुर्मानात्मक दृष्टिकोण (Life span) व दुसन्याला छेद दृष्टिकोण (Cross-Sectional ) म्हणतात. व्यक्तिविकासाचा अभ्यास कसा केला जातो यावरून हे दोन
दृष्टिकोण ठरविलेले आहेत. व्यक्ती विकासाचा विचार प्रामुख्याने शारीरिक, बौद्धिक,भावनिक, सामाजिक व नैतिक या पैलंच्या संदर्भात केला जातो. हा अभ्यास कसा केला
जातो. त्यावरून ही नावे दिली गेली आहेत.

१. आयुर्मानात्मक दृष्टिकोण : व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यभरात एकाच पैलू
संदर्भात विकास कसकसा होत जातो हे अभ्यासण्यासाठी जो दृष्टिकोण वापरतात त्याला
आयुर्मानात्मक दृष्टिकोण म्हणतात.
___ आयर्मानात्मक दृष्टिकोणात एखाद्या विशिष्ट गुणसमुच्चयाच्या संदर्भात किंवा
व्यक्तीच्या समायोजक वर्तनाचा विशिष्ट घाट ठरविणाऱ्या सर्व प्रमुख गुणसमुच्चयांच्या
संदर्भात अभ्यास केला जातो. या दृष्टिकोणात एकाच व्यक्तीचा किंवा व्यक्तिसमूहाचा
दीर्घकाळपर्यंत म्हणजेच आयुष्यभर म्हणजेच शैशव, किशोर, कुमार, प्रीट व वृद्ध या सर्व
अवस्थेत क्रमाक्रमाने येणाऱ्या विकासाच्या अवस्थांचा अभ्यास केला जातो.

उदा. ताण किंवा सहिष्णुता, आक्रमकता, सामाजिकता, संवेदनशीलता, ताठरता
किंवा लवचिकता, अंतर्मुखता किंवा बहिर्मुखता,वर्चस्व किंवा लिनता इत्यादीपैकी कोणत्याही गुण घटकांच्या संदर्भात सर्व अवस्थांमध्ये अभ्यास आयुर्मानात्मक दष्टिकोणात केला जातो. सामाजिकता किंवा संवेदनशीलता हा गुणघटक घेतला तर बालक जन्मल्यापासून शैशव, किशोर, कुमार, प्रौढ व वृद्ध या सर्व अवस्थेत या गुण घटकांच्या
संदर्भात कसकसा विकास होत जातो तसेच विकासाची वैशिष्ट्ये कोणती आहेत‌ हे अभ्यासले जातात.

जन्मापासून अभ्यास करण्यापेक्षा प्रौढ अवस्थेत एखादी व्यक्ती यशस्वी टाक
असेल तर यशस्वीतेसाठी उपयोगी ठरणारे कोणकोणते गुणघटक जन्मापासूनच्या अवस्थेत
होते का? हे पाहण्यासाठी प्रौढ अवस्थेकडून मागील अवस्थेतील अभ्यास या दृष्टिकोणात केला जातो.

म्हणजेच आयुर्मानात्मक दृष्टिकोणातील अभ्यास पुरोलक्षी किंवा भूतलक्षी स्वरूपाचा
असतो. पुरोलक्षीमध्ये लहान मुलापासून सुरुवात करून ते मूल ठरावीक वयाचे होईपर्यंत सतत अभ्यास केला जातो आणि भूतलक्षीमध्ये प्रौढ अवस्थेपासून सुरुवात करून त्याच्या मागील आयुष्यातील किंवा जन्मापर्यंतची माहिती व्यक्ती इतिहास पद्धतीने मिळवली जाते.

या दृष्टिकोणात व्यक्तीच्या विकासाचे स्वतंत्र विश्लेषण करता येते. क्रमाने सर्व
अवस्थामधील एखाद्या गुणसमुच्चयाचा अभ्यास केला जातो. मात्र यात जन्मापासून वृद्ध अवस्थेपर्यंत अभ्यास करत असल्याने कालावधी जास्त लागतो आणि एकच अभ्यासक
शेवटपर्यंत उपलब्ध होईलच असे नाही. खर्चही जास्त येतो. तसेच माहिती विस्तृत असल्याने त्याचे विश्लेषण करणे कठीण होते.
२. छेद दृष्टिकोण : जेव्हा विकासाच्या कोणत्याही एका अवस्थेत त्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप कसे असते हे अभ्यासले जाते तेव्हा त्याला छेद दृष्टिकोण म्हणतात.

उदा. एखाद्या व्यक्तीचा किशोरावस्थेतील विविध पैल संदर्भात विकास कसकसा होत जातो हे या छेद दृष्टिकोणाचा उपयोग करून अभ्यासले जाते.शैशव, किशोर, कुमार, प्रौढ यांपैकी कोणत्याही वयोगटातील बहुसंख्य व्यक्तींचे सर्वसामान्य वर्तन कसे असते याचा अभ्यास या दृष्टिकोणानसार केला जातो. प्रत्येक
वयोगटासाठी स्वतंत्र नमुना गट घेतला जातो व त्या वयोगटातील व्यक्तींकडून प्रश्नावल्या,निरीक्षणे, दैनंदिनीतील नोंदी इत्यादींच्या साहाय्याने माहिती एकत्र केली जाते. त्यावरून
त्या वयोगटासाठी प्रातिनिधिक व्यक्तीच्या वर्तनाचे चित्र रेखाटण्यात येते. या दृष्टिकोणात एका अवस्थेतील वर्तनाचा अभ्यास केला जातो म्हणून यास 'अवस्था दष्टिकोण' असेही म्हणतात.
या दृष्टिकोणात एकाच अवस्थेचा अभ्यास करत असल्याने कालावधी कमी लागतों एकच अभ्यासक याचा अभ्यास करू शकतो आणि खर्चही कमी येतो.

(ड) मानवतावादी दृष्टिकोण व विकास प्रक्रिया 

       Humanism या इंग्रजी शब्दासाठी मराठीत मानवतावाद असे म्हटले आहे आणि Humanism यामधील मूळ शब्द Humanitas हा आहे. आणि याचा अर्थ 'मानवाचे शिक्षण' असा होतो.

तसेच Humaniora (ह्युमॅनि ओरा) या शब्दापासून Humanism हा शब्द निर्माण झाला आहे असे काही तत्त्वज्ञ म्हणतात. आणि Humaniora चा अर्थ आहे 'मानव आणि त्याच्या भोवताली असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास'.

मानवतावादी दृष्टिकोणात मानव हा केंद्रस्थानी मानला जातो. म्हणजेच यामध्ये मनुष्यत्वाचा विचार करण्यात आलेला आहे. 

मानवतावादी दृष्टिकोणामध्ये व्यक्तीला अयोग्य, दुर्बल कल्पना आणि वाईट विचार
यापासून अलिप्त ठेवून सकारात्मक उत्कृष्ट जीवनप्रणालीचा अंगीकार केलेला दिसून येतो. यामध्ये व्यक्तिविकास व आत्मप्रत्ययाची प्रचिती याला फारच महत्त्व दिलेले दिसून येते.

थोडक्यात, 'मूलतः माणूस वाईट नसतो' हा मानवतावादी दृष्टिकोणाच्या विचाराचा गाभा असलेला दिसतो.

मानवतावादी दृष्टिकोणामध्ये बोधात्मक प्रक्रियांना महत्त्व दिलेले असून अबोध प्रक्रिया, भूतकालीन कारणे यांना कमी महत्त्व दिलेले आहे. तसेच मानवी सुप्त क्षमतांना अधिक महत्त्व दिले आहे. भूतकाळापेक्षा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी इच्छा- आकांक्षा, प्रेम, मूल्ये, सर्जनशीलता, व्यक्तिविकास, आत्मसाफल्य यातूनच व्यक्ती आत्मप्रगटीकरण करू शकते यावर भर दिलेला आहे.

बालकांमध्ये लोकशाही तत्त्वे रुजविणे, व्यक्ती हीच मानवतावादाची मूळ स्त्रोत असल्यामुळे बालकांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, मानवतावादी मूल्ये रुजविणे, बालकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणे आणि भविष्याकरिता सर्जनात्मक कार्य करण्यास मार्गदर्शन करणे इत्यादी मानवतावादी दृष्टिकोणी शिक्षणाची ध्येये आहेत.

मानवतावादाच्या तत्त्वज्ञानात लोकशाही पद्धतीवर विश्वास, व्यक्तिस्वातंत्र्यावर विश्वास, शास्त्रोक्त वाङ्मयातील ज्ञानाचे संवर्धन करण्यास संधी देणे, भविष्यासाठी विकासात्मक प्रक्रिया राबविणे, व्यक्तिसामर्थ्यावर विश्वास, सर्वांमध्ये मानव श्रेष्ठ इत्यादींचा समावेश केला जातो.

मानवतावादी दृष्टिकोणातून व्यक्तिमत्त्व विकास ही संकल्पना कार्ल रॉजर्स आणि अब्राहम मॅस्लो यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपपत्तीत मांडली आहे.

व्यक्ती आत्मप्रगटीकरण करू शकते, त्या व्यक्तीमध्ये तशा क्षमता असतात. व्यक्ती स्वतःचा विकास स्वतः करू शकते. त्यामुळे व्यक्ती स्वतःची आत्मोन्नती करू शकते व चांगले व्यक्तिमत्त्व घडवू शकते असा सकारात्मक दृष्टिकोण कार्ल रॉजर्स व मॅस्लो यांनी त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोण असलेल्या उपपत्तीमधून मांडलेला दिसतो. 

व्यक्तिमत्त्व विकासाची घटनाशास्त्रीय उपपत्ती- कार्ल रॉजर्स

रॉजर्सने त्याच्या उपपत्तीत 'स्व' चा विकास कसा होतो हे स्पष्ट केले आहे. रॉजर्स उपपत्ती खालील चार गृहीतकांवर आधारलेली आहे. 

१. इच्छा, आकांक्षा, मूल्ये, प्रेम, सर्जनशीलता यामधून व्यक्ती आत्मसाफल्यात्मक विकास करू शकते.

२. मूलतः माणूस वाईट नसतो.

३. व्यक्तीमध्ये अध्ययनाची क्षमता निसर्गतःच असते. अध्ययनातून 'स्व'चा विकास होतो. 

 ४. व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे 'स्व' चा विकास. हा विकास अध्ययनातून होतो.- किंवा 'स्व'च्या नैसर्गिक अनुभूतीतून होतो.

रॉजर्सने 'स्व' आणि 'स्व' विकास या व्यक्तिमत्त्व विकासातील दोन पैलूंवर अधिक भर दिला आहे. समाज, परिसर, आंतरक्रिया, समायोजन इत्यादी मानसिक क्रिया याचा विचार 'स्व'ची निर्मिती विकास आणि आत्मउन्नतीच्या सकारात्मक दृष्टीने केल्यास व्यक्तीचे वर्तनदेखील सकारात्मक तयार होते. यासाठी सहजीवन समायोजन व सहकार्याची भावना विद्यार्थ्यात जोपासावी. शालेय जीवनात 'स्व' चा विकास होईल अशा नैसर्गिक अनुभूती निर्माण कराव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या