calendar

header ads

आमवात

आमवात
==========

आमवात!सर्वसाधारण व्यक्तीला आपण सहजच बोलताना बघतो की मला वाताचा त्रास आहे, माझे सांधे वातामुळे जखडले गेलेत आदी. मग हा वात आणि आमवात एकच का? की हे वेगवेगळे आहेत? यांची लक्षणे काय? यावर यशस्वी चिकित्सा आयुर्वेदात आहे का? आमवात इतर वातव्याधींपेक्षा वेगळा कसा ओळखावा? यापासून पूर्ण सुटका मिळू शकते का? असे एक न अनेक प्रश्न घेऊनच रुग्ण आम्हा आयुर्वेद चिकित्सकांकडे येत असतो.
जिवंतपणे पार यातना भोगायला लावणारा आपल्या विकृतींनी जीवन कष्टमय करणाऱ्या आमवाताची ओळख करून घेऊ. ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटीसला आमवात हे सर्वात जवळचे नाव म्हणता येईल तरी तपशीलात थोडा फरक राहतो. तरी आपण आमवाताचाच प्रामुख्याने विचार करू.

आमवाताचा विचार सांगताना जी कारणं सांगितली आहेत त्यामध्ये विरुद्ध आहार घेणे, काळ आणि पचनक्षमता यांच्या विपरीत जीवन जगणारा, स्निग्ध आणि पूर्ण भोजन करून त्यावर व्यायाम करणारा किंवा अजिबात व्यायाम न करणारे लोक आमवाताचे शिकार होतात असं म्हटलेलं आहे. यामध्ये विरुद्ध आहाराबद्दल बोलायचं तर आपल्या सध्याच्या आहारामध्ये अत्यंत प्रिय असे पदार्थ त्यात समाविष्ट होतात. पूवीर् त्यांची संख्या मर्यादित होती पण आता दूरचित्रवाणीच्या प्रत्येक वाहिनीवर येणाऱ्या खाद्यपदार्थ शिकवणाऱ्या कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. विरुद्ध आहार हे आयुवेर्दातील स्वतंत्र प्रकरण आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे लिहावं लागेल. तरीही व्यवहारातील उदाहरणं द्यायची झाली तर दुधात केलेली केळ्याची शिकरण, फ्रुट सॅलड, ब्रेड आणि दूध, अशी काही उदाहरणं देता येतील. व्हाईट सॉस घालून केलेले पदार्थ, पिझ्झा, हे विरुद्धपद्धतीने तयार झालेले पदार्थ हल्ली रोजच्या खाण्यातही येऊ लागले आहेत. याचे परिणाम लगेच जरी नाहीत तरी दूरगामी आहेत. पित्ताचे आणि त्वचाविकाराचे रुग्ण वर्षानुवषेर् खात असलेली शिकरण थांबवून थोड्या

औषधांनी बरी झालेली उदाहरणे बहुतेक सर्व आयुवेर्दाच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात असतात. स्निग्ध भोजन करून त्यावर श्रम करणे हे आमवात या प्रकारच्या सांध्याच्या दुखाण्यातील मोठे कारण आहे. महिलांनी दुपारी असणारी पोहण्याची वेळ किंवा जीम ची वेळ या प्रकारातील आजार निर्माण करू शकतात. या विषयात गाडीवर मिळणाऱ्या बहुतेक सर्व पदार्थाची यादी द्यावी लागेल. असे विरुद्ध आहार कधीतरी खाणे आणि आठवड्यातून दोन-चार वेळा खाणं यात फार फरक आहे तो समजून घेतला तर तुमचा दही-बटाटा-पुरी खाण्याचा आनंद आयुवेर्दाच्या या तत्त्वामुळे हिरावला गेला असं वाटण्याचं कारण नाही. पण शरीराच्या आरोग्यापुढे जिभेच्या आनंदाला किती महत्त्व द्यायचं हे ठरवायला नको का?

अंगदुखणे, तोंडाची चव कमी वा नाहीशी होणं, तहान सारखी लागणं (हे लक्षण मधुमेहात दिसतं पण येथे तीव्रता तेवढी नसते), आळस वाटणे, ताप, पचन चांगले न होणे,

हात-पाय अवयव दुखणे, अशी लक्षणं निर्माण होतात. त्यानंतर हाता- पायाचे सांधे धरणं-सुजणं, संधींमध्ये विंचवाने डसल्याप्रमाणे तीव्र वेदना, तोंडात पाणी सुटणं, भूक न लागणं तोंडाची चव बिघडणं, शरीराचा दाह, मूत्रप्रवृत्तीचं प्रमाण वाढणं, झोप सारखी येणं किंवा बिघडणं, चक्कर, मुर्च्छा अशी विविध लक्षणं निर्माण होतात. आता ही लक्षणं अनेक व्याधींमध्ये निर्माण होतात पण ती कोणत्या व्याधीकडे निदेर्श करतात ते ठरवणं आपण करू नये. कित्येक वेळी ही लक्षणं साधी वाटतात इतर व्याधींसारखी वाटतात त्यामुळे हा व्याधीनिश्चय होण्यासाठी वेळही लागतो. या रोगामध्ये पोटातील अजीर्ण वाटण्यासारखी लक्षणंही दिसतात त्यामुळे कित्येकवेळी वेगळंच चित्र उभं राहातं.

आमवात हा कष्टसाध्य व्याधींपैकी एक आहे. अतिशय कष्टपूर्वक, मेहनतीने, नियमित चिकित्सा देऊन रुग्णाने कायमस्वरूपी पथ्य पाळूनच यात यश मिळणार आहे. प्रथमत: अतिशय आशेने आलेल्या रुग्णाला हे कटू सत्य पचनी पडणे तेवढेच जिकिरीचे असते. त्यामुळेच आमवाताने पीडित व्यक्ती, व्याधिग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांनी खचून न जाता मध्येच चिकित्सा सोडून देऊ नये. अतिशय सकारात्मक जीवनशैली आत्मसात करून या व्याधीचा मुकाबला करावा.

आमवात तसा म्हटला तर वातव्याधीचाच भाऊबंद. फरक एवढाच की या व्याधीची भाऊबंदकी जरा जास्तच घट्ट असते. जसे की या व्याधीच्या नावातच आपणास दोन शब्द जाणवतात. 1- आम, 2-वात.

1) आम - म्हणजे अपक्व आहार रस
2) वात - शरीरात प्रकोपित झालेला वातदोष
आपण सेवन केलेल्या आहारावर जठराग्नीची प्रक्रिया होऊन प्राकृत आहाररस तयार होतो. काही कारणास्तव जसे की अग्निमांद्य निर्माण झाले असता हा तयार होणारा आहाररस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतो व आमनिर्मिती होते.
याच्याच सोबतीने वातप्रकोपक आहार-विहाराच्या सेवनाने प्रकोपित झालेला वातदोष या अपक्व आहार रसास (आमास) शरीरातील विविध सांध्यांच्या ठिकाणी नेऊन आश्रयित होतो. आमवात व्याधीची निर्मिती होते.
आमवाताची कारणे
*अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे)
*विरुद्ध आहार-विहाराचे सेवन
*अभिष्यंदी (दोषप्रकोपक) आहाराचे सेवन. उदा. दही, आंबवलेले पदार्थ इत्यादी
*दीर्घकाळपर्यंत शिळ्या पदार्थांचे सेवन
*अति लंघन (अति उपवास) करणे
*मलमूत्रादी अधारणीय वेगांचे धारण करणे
*रात्री अति प्रमाणात जागरण (रात्रपाळी करणा-या व्यक्ती)
*वातप्रकोपक आहारविहार
*दिवास्वाप (दिवसा झोपणे)
*व्यायामाचा पूर्णत: अभाव
ही आमवाताची प्रमुख कारणे आहेत.

आमवाताची लक्षणे
*संधिशूल (सांध्यांच्या ठिकाणी वेदना)
*वेदनांचे स्वरूप हे वृश्चिक दंशवत (विंचू चावल्याप्रमाणे) असते.
*संधिशोध (सांध्यांच्या ठिकाणी सूज)
*सांध्यांच्या ठिकाणी उष्ण स्पर्श जाणवणे.
*सांध्यांच्या ठिकाणी आरक्त वर्णता (लालसरपणा)
*प्रात:काळी विशेषत: शीतऋतूत पर्वसंधी प्रदेशी वक्रता. (हातपायाची बोटे वाकणे)
*संचारी शूल व संचारी वेदना हे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. अर्थात एकाच वेळेला विविध सांध्यांमध्ये वेदनांचा संचार होत असतो. ज्वर प्रचिती (ताप जाणवणे)
*सांध्यांच्या ठिकाणी क्रियाशूल, क्रियाकल्पता, क्रियाहीन होणे.
*जीर्णावस्थेत उपद्रव स्वरूपात हृद्रोग होण्याची दाट शक्यता असते.
आमवाताची चिकित्सा -
व्याधिबल, रुग्णबल, व्याधीची प्रकृती, रुग्णाची प्रकृती, व्याधी अवस्था, देश, रुग्णाची सात्म्य-असात्म्यता इत्यादी या गोष्टींचा विचार करूनच चिकित्सा होते.
दोष प्राधान्यानुरूप, रुग्णबल बघून, वमन-विरेचनादी पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी केली जाते.
विविध औषधी कल्पांची अतिशय कल्पकतेने योजना करून रुग्णाच्या शरीरातील वाढलेल्या दोषांना साम्यावस्थेत आणले जाते.
पथ्यापथ्याची जोड देऊन चिकित्सा पूर्ण होते.

जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून, दिनचर्या, ऋतुचर्या यांचे पालन करून तसेच पथ्यापथ्यावर योग्य नियंत्रण ठेवून,आपण निश्चितच आमवात या कष्टसाध्य व्याधीवर नियंत्रण मिळवू शकतो. या सर्वांच्या सोबतीला आवश्यक असते ती खंबीर पाठिंब्याची, केवळ रुग्णाचीच नव्हे तर रुग्णाच्या नातेवाइकांचीसुद्धा!
वातव्याधीसाठी पथ्यापथ्य
-पथ्य - तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ
-अपथ्य - रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.
---------------------------------------------------------------
सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या