calendar

header ads

★★★ शाहिस्तेखान, लालमहाल आणि शिवरायांचा छापा ★★★

------------------------------------------------------------------------------------

शिवरायांच्या जीवनातील अनेक रोमांचकारी घटनेतील एक महत्वाची घटना म्हणजे "शाहिस्तेखानावरील छापा".  इयत्ता चौथीपासून आम्हाला ही घटना सांगितली गेली. ही घटना दोन गोष्टींमुळे आपल्या डोक्यात बसली, पहिली म्हणजे "शाहिस्तेखानाची तोडलेली तीन बोटे" आणि दुसरी म्हणजे "लालमहाल" जिथे शिवरायांचं बालपण गेले.

शिवरायांनी ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी खान लालमहालात होता आणि शिवरायांना लालमहाल पूर्णपणे माहीत होता असे आपण आजवर ऐकत आलो. ज्यावेळी छापा टाकला त्यावेळी खान नक्की महालात होता की आणखीन कुठे? यावर अनेक समकालीन संदर्भ उपलब्द आहेत ज्यामध्ये या पूर्ण प्रसंगाची हकीकत सांगितली आहे. त्याचबरोबर अनेक बखरींमध्येही या प्रसंगाचे वर्णन आहे. समकालीन उल्लेख हे नेहमीच विश्वसनीय मानले जातात. ज्या बखरी त्याच काळात लिहिल्या गेल्या त्याही विश्वसनीय मानता येतील पण समकालीन उल्लेख जे तो प्रसंग पाहिलेल्यांनी मांडले आहेत त्यापेक्षा बखरी नक्कीच नाही.

पहिल्यांदा आपण या प्रसंगाचे वर्णन कुठे कुठे सापडते आणि कोणी कोणी केले आहे हे पाहू. यामध्ये मराठी संदर्भ आहेत आणि काही इतर इतिहासकारांचे संदर्भ आहेत.

इतर इतिहासकारांचे संदर्भ:

१) भीमसेन सक्सेना (समकालीन)
२) खाफीखां (समकालीन)
३) अलिनामा (विजापूरचा राजकवी मुहंमद नुस्त्रती याने लिहिलेले 'अलीनामा' हे काव्य जे घटनेनंतर चार-पाच वर्षांच्या आता लिहिले गेले)

मराठी संदर्भ:

१) जयराम पिंडे लिखित 'पर्णालपर्वत ग्रहणाख्यान'
(१६७३ साली रचलेले काव्य)
२) जेधे शकावली
(१६९७ च्या आसपास लिहिली असावी कदाचित त्यानंतर सुद्धा)
४) जेधे करिना
५) सभासद बखर (१६९६)
६) ९१ कलमी बखर (१७०१ ते इ.स. १७०६)
७) चिटणीस बखर (छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी लिहिली)

(माझ्या वाचनातून एखादा संदर्भ राहिला असेल तर सांगावा)

_________________________________
_________________________________

सेतुमाधवराव पगडी यांनी या घटनेचे विश्लेषण प्रत्येक संदर्भाचा आधार घेऊन अतिशय सुंदरपणे केले आहे. वरील प्रत्येक साधनांमध्ये काय उल्लेख आहेत हे पाहण्यापेक्षा शाहिस्तेखानाच्या प्रसंगाच्या घटनेला जवळची साधने म्हणजे भीमसेन सक्सेना, खाफीखां, सभासद बखर यामध्ये काय आणि कसे उल्लेख आहेत हे पाहू.

सर्वप्रथम भीमसेन सक्सेना आणि खाफीखां यांनी या घटनेबद्दल काय नोंदी करून ठेवल्या आहेत हे पाहू. सभासद आणि जेधे शकावलीपेक्षा या दोघांच्या नोंदी माझ्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. याचे कारण की, या घटनेच्या वेळी भीमसेन सक्सेना हा औरंगाबादमध्ये होता. याचा चुलता "शामदास" ज्याची दक्षिण सुभ्याच्या चिटणीस पदी नियुक्ती झाली होती आणि तो शाहिस्तेखानाच्या छावणीत दाखल झाला होता. म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तो घटनास्थळी होता. त्यामुळे भीमसेनने जी हकीकत सांगितली आहे ती महत्वाची ठरते. याचबरोबर, खाफीखानाचा बाप हा शाहिस्तेखानाच्या पदरी कार्यरत होता आणि या घटनेच्या वेळी तो खानासोबत पुण्यातच होता. या प्रसंगाची पूर्ण हकीकत त्याने आपल्या मुलाला सांगितली. यामुळे भीमसेन आणि खाफीखां यांचे उल्लेख मला महत्वाचे वाटतात.

■ भीमसेन सक्सेना:

या छाप्याच्या पूर्वतयारीबद्दल भीमसेन म्हणतो,

"शाहिस्तेखान हा पुण्यात होता. त्याने एक हवेली बांधली.... शिवाजींनी आपल्या हेरांकरवी शाहिस्तेखानाच्या बाजाराची आणि वाटांची इतकी बारीकसारीक माहिती काढली की जणू काय स्वतःच ती स्थळे अनेकदा आपल्या नजरेखालून घातली होती."

इथे भीमसेन "लालमहाल" नाही तर "हवेली"चा उल्लेख करतो. यावरून असे सांगता येईल की, पुण्यात ज्यावेळी (९ मे १६६० रोजी) खान आला त्यावेळी त्याने लालमहालावर कब्जा मिळवला परंतु त्याने त्यानंतर स्वतःसाठी त्याने एक हवेली बाजूलाच नदीच्या काठी बांधलेली असावी. मराठी संदर्भांचा जर विचार केला तर जेधे शकावली व करिना यया दोन्हींमध्ये लालमहालाचा उल्लेख आहे परंतु सभासद बखरीमध्ये ".. हल्ला शाहिस्तेखानाच्या डेऱ्यावर झाला झाला...." सभासद कुठेही लालमहालाचा उल्लेख करत नाही. "....तंबूच्या कनाती फाडून महाराज आत शिरले..." असे सभासद म्हणतो.

आता हल्ल्याबद्दल भीमसेन काय म्हणतो ते पाहू,

"... एके दिवशी (५ एप्रिल १६६३) शिवराय दोनशे अनुभवी व कसलेल्या लढवय्यांना बरोबर घेऊन, वीस कोसांचे अंतर पायी कापून रात्रीचे दोन प्रहर झाले असता आले. जसवंतसिंहाच्या बाजाराजवळून ते पुढे सरकले. नंतर ते खानाच्या मुद्पाक-खान्यापाशी आले. खानाच्या जनानखान्याच्या इमारतीला त्यांनी भगदाड पाडले. आपल्यापैकी दोघांतिघांना त्यांनी आत पाठवले. त्यांच्या पाठोपाठ शिवाजी आत गेले. त्यांच्या मागे इतर दहा माणसे आत शिरली. जनानखान्यातील स्त्रियांनी खानाला ही हकीकत सांगितली. यावर खान आपले शय्यागृह सोडून वाड्याच्या ओसरीवर आला. अंधारी रात्र होती. कोण माणसे आली काही समजेना. त्यांच्याकडून खानाला दोन जखमा झाल्या. वाड्याच्या दुसऱ्या दिवाणखान्यात अनेक दिवे जळत होते. खानाचा मुलगा अबुलफतेह तेथे झोपला होता. तोच शाहिस्तेखान समजून लोक त्याच्यावर तुटून पडले. त्याचे डोके कापून ते आपल्याबरोबर घेऊन गेले. या सुमारास खान घाबरलेल्या स्थितीत दिवाणखान्याच्या देवडीवर आला. बरोबर काही शिपाई होते. त्यांना त्याने आत पाठवले. थोडीबहुत मारामारी झाली. शिवराय सुरक्षितपणे निघून गेले. आजपर्यंत कोणत्याही राजाने मोगल सरदाराविरुद्ध असे युद्ध किंवा धाडस केले नव्हते."

वरील बाबींवर जर लक्ष टाकले तर खालील बाबी पुढे येतात,

● हल्ला वाड्यावर झाला होता.
● शिवरायांसोबत प्रथम दोनशे माणसे होती. नंतर फक्त १० माणसे आत घुसली ज्यामध्ये स्वतः शिवराय सुद्धा होते.
● खानाला दोन जखमा झाल्या. जखमा म्हणजे नेमकं काय झालं हे समजत नाही.
● खान समजून त्याच्या मुलाला मारून त्याचे डोके घेऊन गेले.
● अतिशय महत्त्वाची नोंद म्हणजे, "आजपर्यंत कोणत्याही राजाने मोगल सरदाराविरुद्ध असे युद्ध किंवा धाडस केले नव्हते."

_________________________________
_________________________________

■ खाफीखां

इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे, खाफीखां हा मोगलांचा दरबारी इतिहासकार नव्हता. त्याने मोगल साम्राज्याचा इतिहास १७३४ मध्ये लिहिला. शिवकाळातील अनेक घटना त्याला समकालीन आहेत.  "आलमगीरनामा" हा ग्रंथ औरंगजेब बादशहाच्या हयातीत लिहिला गेला आहे. या ग्रंथाचा लेखक 'महमद काझीम' हा मोगलांचा दरबारी लेखक होता. शाहिस्तेखानावरील छाप्याची नोंद याने फक्त एका वाक्यात केली आहे. तो म्हणतो, "शिवाजीने शाहिस्तेखानावर रात्रीच्या वेळी धाडसी छापा घातला". ही घटना म्हणजे मोगलांचा नुसता पराभव नसून अतिशय मानहानीकारक असा पराभव असून मोगलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला होता. विशेष म्हणजे शाहिस्तेखान म्हणजे खुद्द आलमगीर औरंगजेब बादशहाचा मामा होता. त्यामुळे या घटनेचा पूर्ण तपशील मोगलांचा लेखक कसा मांडेल?

या घटनेचा संपूर्ण तपशील सांगताना खाफीखां म्हणतो,

बादशहाला कळवण्यात आले की, शिवाजीने अमीरुल उमरा (शाहिस्तेखान) याच्यावर त्याच्या राहत्या वाड्यावर रात्री छापा घातला. हल्ल्यात शाहिस्तेखानाचा मुलगा अबुलफतेह खां मारला गेला. शाहिस्तेखान जखमी झाला. माझे वडील शाहिस्तेखानाच्या पदरी होते आणि या मोहिमेत ते खानाबरोबर होते. त्यांच्याकडून जो तपशील मला कळला तो खाली देत आहे.

"नियम असा करण्यात आला होता की, जर कोणी सशस्त्र किंवा निशस्त्र मनुष्य  (विशेषतः मराठा) जो मोगलांच्या चाकरीत नसेल त्याला शहरात किंवा लष्करात येण्याची परवानगी नाही. मराठे स्वरांना मोगलांच्या चाकरीत घेण्यात आले नाही. एके दिवशी काही मराठे पायदळ शिपायांनी कोतवालाकडून लग्नाचे कारण सांगून दोनशे मराठ्यांचे परवाने मिळवले. यामध्ये एका मुलाला नावदेवाचा पोशाख घालण्यात आला होता. त्याच्याबरोबर मिरवणुकीत मराठे होते. ताशेवाजंत्री होती. ही वरात संध्याकाळच्या सुमारास पुण्यात शिरली. त्याच दिवशी संध्याकाळी आणखी एका तुकडीला शहरात येऊ दिले. सांगण्यात आले की, मोगलांच्या एका लष्करी ठाण्यावर गनिमांचे (मराठ्यांचे) लोक पकडण्यात आले आहेत. या लोकांचे हात बांधण्यात आले होते. ते उघडबोडके होते. पहारेकरी त्यांना दोराने बांधून हाकलीत होते, आणि इरसाल शिव्या मोजीत होते. ते कैदी आणि पहारेकरी लष्करी चौकीच्या समोरूनच शहरात घुसले.

ही सगळी (वरातीतले आणि कैदी-पहारेकरी) वाड्यात एकत्र झाली व त्यांनी शस्त्रे धारण केली. नंतर ही खानाच्या मुद्पाक-खाण्याजवळ आली. जी खानाच्या जनानखान्याजवळ होती. मुद्पाकखाना आणि जनानखाना यांच्यात एक खिडकी होती जी चुना विटांच्या साह्याने बंद केली होती जी मराठ्यांना माहीत होती. मराठे वाड्याच्या आत शिरले व खानाच्या नोकरांवर तुटून पडले. काहींना झोपेतच मारून टाकले. मराठे खिडकीकडे गेले. रमजानचा महिना चालू होता म्हणून स्वयंपाकी सकाळच्या नाश्त्याच्या तयारीसाठी उठले होते. मराठे खिडकी कुदळीच्या साह्याने खिडकी फोडू लागले. खिडकीला लागून एक दासी खोली होती. एका दासीला कुदळीचा आणि जखमींच्या विव्हळन्याचा आवाज आला. तिने खानाला याची बातमी दिली पण खानाने स्वयंपाकी असतील आणि भांड्यांचा आवाज येत असेल म्हणून तिला हाकलले. नंतर तिने पुन्हा खानाला खिडकी उघडल्याचे सांगितले त्यावेळी मात्र खान जागा झाला आणि हातात धनुष्य आणि भाला घेऊन उभा राहिला. खानाच्या आणि मराठ्यांच्या मध्ये पाण्याचा हौद होता. खानाने मराठ्यांवर बाणाने हल्ला केला. एका मराठ्याने खानावर तलवारीने हल्ला केला ज्यात खानाच्या हाताचा अंगठा तुटला. काही मराठे हौदात पडले ज्यांच्यावर खानाने भाल्याने हल्ला केला ज्यात एक मराठा ठार झाला.

हा गोंधळ पाहून दासींनी खानाला हाताला धरून सुरक्षित स्थळी नेले. यानंतर मराठ्यांची एक तुकडी वाड्याच्या पहारा चौकीवर गेले व "असाच पहारा देत असता काय?" असे म्हणत जागे असलेल्या व झोपलेल्या पहारेकऱ्यांना ठार केले. काही मराठे नगारखाण्याजवळ गेले व नगारे जोरात वाजवण्याचा आदेश खानाचा आहे असे सांगून नगारे जोरात वाजवण्यास सांगितले. यामध्ये दुसरे काहीही ऐकू येत नव्हते. मराठ्यांनी वाड्याचे दरवाजे बंद केले होते. खानाचा मुलगा अबुलफतेह घटनास्थळी धावला. त्याने काही मराठे मारले व जखमी केले. शेवटी तो ही मारला गेला.

खानाचा एक सरदार वाड्याबाहेर होता. त्याने शिडी लावून वाड्यामध्ये प्रवेश केला. तो खानाच्या वयाचा होता. मराठ्यांनी त्याला खान समजून त्याला ठार करून त्याचे शीर कापून नेले. खानाच्या दोन आवडत्या बायका या गोंधळात सापडल्या. एकीचे इतके तुकडे झाले होते की तुकडे एकत्र करून पेटीत घालून पुरावे लागले. दुसरीला चौतीस जखमा झाल्या होत्या. पुढे ती बरी झाली."

वरील बाबींवर जर लक्ष टाकले तर खालील बाबी पुढे येतात,

● खाफीखां आणि भीमसेन यांच्या उलल्लेखात एक मुख्य फरक आढळतो तो म्हणजे खान समजून कोणाला मारले व शीर कापून नेले. भीमसेन म्हणतो खानाचा मुलगा आणि खाफीखां म्हणतो खानाचा सरदार.
● दोघांच्याही उल्लेखात लालमहाल नाही तर वाड्याची नोंद दिसते.
● मराठे पुण्यात कसे आले याचा तपशील खाफीखां देतो.
● खाफीखां, खानाचा अंगठा तुटला असे सांगतो तर भीमसेन म्हणतो की खान जखमी झाला.

_________________________________
_________________________________

■ मुहंमद नुस्त्रती

अलिनामा या उर्दू काव्यात विजापूरचा राजकवी मुहंमद नुस्त्रती याने या घटनेचे वर्णन काव्य स्वरूपात केले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे.

"खान आपल्या जनान्याबरोबर विलासात मग्न होता. वाड्याभोवती पहारेकरी होते. ज्या बंदोबस्तात सैतानही जाऊ शकत नव्हता तिथे शिवाजीने घुसून कापाकापी केली. खानाला जाग आली. त्याने तोंडावर पाणी शिंपडले आणि आपली तलवार उचलली परंतु शिवाजीने त्याला ना तलवार उचलू दिली ना पुढे येऊ दिला व खानावर वार करून जखमी केले. खान जखमी होऊन वाचला खरा पण शेवटपर्यंत त्याच्या ह्रदयात या गोष्टीचे शल्य डाचत होते. खानाला आपले प्रियजन आपल्या समोर मारले गेलेले पहावे लागले. शिवाजीने क्षणात त्याचा मान हिरावून घेतला आणि आपली इच्छा पूर्ण केली. हां हां म्हणता ही बात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पोचली.

_________________________________
_________________________________

■ सभासद बखर

सभासद बखरीमध्ये असलेला तपशील थोडक्यात खालीलप्रमाणे,

"महाराज, चांदराव जेधे, कोयजी बांदल, सर्जेराव जेधे, बाबाजी बापूजी, चिमणाजी बापूजी अशी निवडक माणसे घेऊन राजगड उतरले. दोन फौजा तयार होत्या ज्यांचे नेतृत्व नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे यांनी केले. रात्री अंतर पार करून नवाबाच्या (खानाच्या) डेऱ्याजवळ गेले. डेऱ्याच्या दो तर्फा फौजा उभ्या राहिल्या. निवडक दोनशे लोक घेऊन महाराज आत शिरले. खान जनानखान्यात होता. त्याला ज्यावेळी हे समजले त्यावेळी त्याने जनानखान्यातल्या मेणबत्या विजवुन बायकांत लपून राहिला. महाराज बायकांवर वार करत नाहीत हे जाणून तो तिथे लपून होता. महाराज दोन घटका तिथेच उभे होते. शेवटी खान तलवार घेण्यास धावला त्यावेळी महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला ज्यामध्ये त्याची तीन बोटे छाटली गेली. गनीम वाड्यात आलेत हे मोगलांना कळल्यावर वाड्यात मोगल सैन्य घुसले. यावेळी महाराज तिथून राजगडास निघून गेले.

अशी आहे ही आपल्या शिवरायांची पराक्रमगाथा. एके ठिकाणी कवी परमानंद म्हणतात,

             "कलिकल्मषहारिणि हारीणि जनचेतसाम |
               यशांसि शिवराजस्व श्रोतव्यानि मनीषिभि :

अर्थात, कलियुगातील पापे नाहीशी करणारी आणि लोकांचे चित्ते हरण करणारी अशी शिवरायांची यशोगीते आपण श्रवण करावीत.

तर, असा हा या प्रसंगाचा समकालीन उल्लेखानुसार तपशील आहे. एखादा मुद्दा माया वाचनातून निसटला असेल तर नक्की सांगावे. वरील मांडणीत काही चूक असल्यास निदर्शनास आणून द्यावी ही विनंती.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या